अवैधपणे ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्या ठिकाणांवर लवकरच धाड टाकणार - महापौर किशोरी पेडणेकर




 *आग प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासंदर्भात महापौरांनी घेतली संबंधित यंत्रणांची आढावा बैठक

मुंबई : मुंबईतील आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, अवैधपणे गॅस सिलेंडर, ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्या ठिकाणांवर संयुक्त पथकामार्फत लवकरच धाड टाकण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

वर्सोवा भागात यारी रोड येथील एका गॅस सिलेंडरच्या गोदामाला  तसेच गोवंडी मंडळ येथे आग लागल्यानंतर  संपूर्ण मुंबईत कारवाई  करण्यापूर्वी  संबंधित यंत्रणांची बैठक घेणार असल्याचे  महापौरांनी सांगितले होते. त्यानुसार महापौर  किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आग प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधील पेंग्विन कक्षात कक्षात आज दि. ०२ मार्च २०२१ रोजी पार पडली, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या.

 बैठकीला  जिल्हाधिकारी ( मुंबई उपनगरे) मिलिंद बोरीकर, अप्पर जिल्हाधिकारी  (मुंबई शहर) अरुण अभंग, अप्पर जिल्हाधिकारी (पश्चिम उपनगरे) उद्धव घुगे, अप्पर जिल्हाधिकारी (पूर्व उपनगरे) तेजूसिंग पवार, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे, पोलीस उपायुक्त चैतन्य एस., अग्निशमन अधिकारी (प्रभारी) हेमंत परब तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.



महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावेळी म्हणाल्या की, मुंबईमध्ये आग लागल्यानंतर ही जागा जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या अखत्यारीत आहे असे सांगून प्रभावीपणे अवैध ठिकाणांवर कारवाई होत नसल्याचे संबंधित 

यंत्रणांच्या निर्देशनास आणून दिल्याचे महापौरांनी सांगितले. यामुळे अवैध माफियांचे फोफावत असून ते मुंबईत  अवैध सिलेंडरचा साठा तसेच ज्वलनशील पदार्थांचा  साठा करून ठेवतात. यामुळे आगीच्या अश्या दुर्घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळेच आता जिल्हाधिकारी कार्यालय, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचा संबंधित विभाग तसेच पोलीस  यांचे संयुक्त पथक नेमून माझ्या नेतृत्वात  संपूर्ण मुंबईत  अवैध साठा असलेल्या ठिकाणांवर धाड टाकणार असल्याचे महापौरांनी सांगितले. जोपर्यंत अवैध माफियांवर  कारवाईचा धाक निर्माण होत नाही, तोपर्यंत ही कारवाई करण्यात येणार असून त्यानंतर संयुक्त पथकाद्वारे वेळोवेळी कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

आजच्या बैठकीच्या अनुषंगाने "प्रमाणित कार्यपद्धती"  लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

*******

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget