ऑक्सिजन पुरवठ्यात आणीबाणी उद्भवू नये यासाठी कार्यपद्धती निश्चित



प्रशासनातील घटकांसह मुंबईतील सर्व रुग्‍णालयांनी देखील कार्यपद्धतीचे तंतोतंत पालन करावे, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे सक्‍त निर्देश

मुंबई : कोविड संसर्गाच्‍या प्रादुर्भावामुळे रुग्‍णांसाठी प्राणवायूची गरज सातत्‍याने वाढत असल्‍यामुळे बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्वच रुग्‍णालयांना प्राणवायूचा सुयोग्‍य व काटकसरीने उपयोग करण्‍याच्‍या सूचना यापूर्वीच केल्‍या आहेत. त्‍यासोबत आता प्राणवायूची कमतरता बृहन्मुंबई क्षेत्रातील कोणत्याही रुग्णालयास जाणवत असल्‍यास वेळीच प्राणवायू साठा पुरवता यावा, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने कार्यपद्धती निश्चित केली आहे. ही कार्यपद्धती प्रशासनातील सर्व संबंधित घटकांसह मुंबईतील सर्व रुग्‍णालयांनी तंतोतंत पाळावी, असे सक्‍त निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कोविड बाधित रुग्‍णांवर उपचार करताना सद्यस्थितीत प्राणवायू (ऑक्‍सि‍जन) ची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. तथापि, एकाबाजूला देशभरात प्राणवायू साठ्याची कमतरता जाणवत असताना मुंबईतील सर्व रुग्‍णालयांमध्‍ये प्राणवायू उपलब्‍ध राहील, त्‍याचा काटकसरीने उपयोग होईल, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रारंभापासून अतिशय दक्ष आहे. शनिवार दिनांक १७ एप्रिल २०२१ रोजी महानगरपालिकेच्‍या सहा रुग्‍णालयांमधून १६८ रुग्‍णांना प्राणवायू उपलब्‍ध असलेल्‍या महानगरपालिकेच्‍याच इतर रुग्‍णालयांमध्‍ये अक्षरशः युद्ध पातळीवर कार्यवाही करुन सुरक्षितपणे स्‍थलांतर‍ित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर बुधवार दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या रुग्‍णालयातील प्राणवायू साठा संपण्‍यास जेमतेम दीड तासांचा अवधी शिल्‍लक असताना रुग्‍णालयाने महानगरपालिकेला ही बाब कळवली. त्‍याही दिवशी महानगरपालिका प्रशासनाने पुन्‍हा युद्ध पातळीवर कार्यवाही करुन तत्‍परतेने व वेळेच्‍या आत प्राणवायू उपलब्‍ध करुन दिला.

या दोन घटनांच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच मुंबईसाठी दैनंद‍िन गरजेपेक्षा अधिक आवश्‍यक असलेला प्राणवायू साठा अद्यापही उपलब्‍ध झालेला नसल्‍याची बाब लक्षात घेता, बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने एक कार्यपद्धतीच सुनि‍श्चित केली आहे. प्राणवायू संदर्भात आणीबाणीची परिस्थिती वारंवार रुग्‍णालयांमध्‍ये उद्भवणार नाही, यासाठी ही निश्चित कार्यपद्धती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. 

या कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता संजय शिंदे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास राठोड हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. 



बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त श्री. इकबाल सिंह चहल यांच्‍या आदेशानुसार, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. पी. वेलरासू यांनी या सुनिश्चित कार्यपद्धतीचे आदेश निर्गमित केले आहेत. ही कार्यपद्धती सर्व विभागीय कार्यालये, सार्वजनिक आरोग्‍य विभाग यासह मुंबईतील सर्व रुग्‍णालयांनी तंतोतंत अंमलात आणण्‍याचे सक्‍त निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.




*प्राणवायू पुरवठ्याबाबतची ही कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे.*



१) महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्या कार्यालयात एक सांख्यिकी तक्‍ता (डेटा शीट) तयार करून त्यामध्ये विभागनिहाय सर्व खासगी रुग्णालयांची माहिती प्रसिद्ध करावी. या तक्‍त्‍यामध्‍ये सर्व प्रकारच्या कोविड रुग्णालयांची नावे व त्यांना प्राणवायू पुरविणाऱया पुरवठादाराचे नाव, त्याचप्रमाणे सदर रुग्णालयामध्ये किती ड्यूरा, जंबो आणि छोटे प्राणवायू सिलेंडर उपलब्ध आहेत, याबद्दलची माहिती समाविष्‍ट करण्‍यात येईल. 

ही माहिती महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्‍न व औषध प्रशासन (FDA) नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्यात येईल. याव्यतिरिक्त विभाग कार्यालयात इतर रुग्णालय कार्यरत असतील तर त्याबाबतची माहिती विभाग कार्यालय अद्ययावत करतील व प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांना eemechsouth.me@mcgm.gov.in या ई-मेलवर अवगत करतील. ही सुधारीत माहिती विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करुन देण्यात येईल.

*२) प्राणवायूचा पुरवठा रुग्णालयात योग्य वेळेत व्हावा, यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील.*


अ) रुग्णालयाने प्राणवायूची मागणी पुरवठादाराकडे किमान २४ तास किंवा त्यांच्या करारनाम्याप्रमाणे, यातील जो कालावधी जवळ असेल त्याआधी करावी.

ब) १६ तासामध्ये हा पुरवठा उपलब्ध न झाल्यास रुग्णालय याबाबत विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळवतील.

क) विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. जर विभागातील नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास विभागातील नियंत्रण कक्ष याबाबत अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला कळवतील. 

ड) अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. जर अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष याबाबत गरजेनुसार विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधतील आणि माहिती देतील.

इ) विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता हे आवश्‍यकतेनुसार वाहनांमधून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करतील आणि याबाबत वरिष्ठांना कळवतील.




*३) सर्व वैद्यकीय अधिकारी त्यांच्या अखत्यारितील कोविड रुग्णालयास प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होण्याकरीता या सूचनांचे पालन करण्यासाठी कळवतील.*



*४) त्याचप्रमाणे विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षातील अधिकारी संबंधित रुग्णालयाच्या संपर्कात राहून तेथील प्राणवायू सिलेंडर्सची नोंद ठेवतील.*



सर्व सहाय्यक आयुक्त यांनी त्‍यांचे विभागीय वैद्यकीय अधिकारी तसेच नियंत्रण कक्षातील अधिकारी यांना या कार्यपद्धतीविषयी अवगत करावे. कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी याबाबत सर्व रुग्णालयांना सूचित करावे. मुंबईतील सर्व संबंधित रुग्णालयांनी त्यांच्याकडे भरती असलेल्या रुग्णांच्या संख्येप्रमाणे प्राणवायूचा पुरवठा सुरळीत राहण्याबाबत योग्य ती दक्षता व जबाबदारी घ्यावी, याबाबत त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशा सूचनाही यातून करण्‍यात आल्‍या आहेत.

**

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget