येत्या शैक्षणिक वर्षांपासून नांदेडमधील शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तयारी करावी --वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख            मुंबई, दि. 7 : परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता राज्य शासनाने नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात 'नर्सिंग कॉलेज' मंजूर केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तयारी करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

            डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात संदर्भातील बैठक आज ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, डॉ. दिलीप म्हैसेकर, नांदेड शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय.आर.पाटील, आयुषचे संचालक कुलदीप राज कोहली, उपसचिव प्रकाश सुरवसे आदी उपस्थित होते.

             देशमुख म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात 50 प्रवेश क्षमतेचा बीएससी परिचर्या अभ्यासक्रम सुरू होणार असून संबंधित अधिष्ठाता यांनी याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. या महाविद्यालयास आवश्यक प्राचार्य आणि व्याख्याते यांच्यासह आवश्यक मनुष्यबळ देण्यात यावेत.

मंजूर रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही तात्काळ सुरू करावी

            नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील मंजूर रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही तात्काळ सुरू करावी. सध्या महाराष्ट्रावर कोविडचे संकट असल्याने वैद्यकीय सेवेवर प्रचंड ताण आहे. डॉक्टर,परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांची सतत आवश्यकता भासत आहे. वैद्यकीय सेवेशी निगडित विभागाला आवश्यक असणारी पदे भरण्याची परवानगी शासनाने देण्यात आल्याने रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात यावी.

वर्ग 4 ची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास परवानगी

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग 4 ची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास परवानगी देण्यात आल्याने याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी. आयुष संचालकांनी आयुर्वेद महाविद्यालयातील वर्ग 3 ची पदे भरण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना मार्गदर्शन करावे व तसेच कार्यवाही पूर्ण करण्यावर भर द्यावा. सध्या कोविडची दुसरी लाट असून तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आयुष संचालक यांनी या संदर्भातील प्राथमिक पूर्वतयारी करावी, असे निर्देश दिले.

            डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालयातील बांधकामासाठी शासनाने परवानगी दिली असून यासंदर्भात आत्तापर्यंत किती काम पूर्ण झाले आहे,कामाबाबत निविदा काढण्यात आली आहे का,कामाची सद्यस्थिती काय आहे, याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देशही वैद्यकिय शिक्षण संचालक यांना देण्यात आले आहेत. सध्या सर्वच ठिकाणी डॉक्टर, परिचारिकांची आवश्यकता भासत आहे अशातच अनेक ठिकाणी परिचारिकांची संख्या कमी असल्याने परिचारिकांच्या मुदतीपूर्वी बदल्या करण्यात येऊ नयेत, असे देशमुख यांनी सूचित केले.

0000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget