मुंबईतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त बालकांमध्ये आढळली प्रतिपिंड*कोविडच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने केले सर्वेक्षण*

*पूर्वीच्या तुलनेत प्रतिपिंडं असलेल्या मुलांची संख्या वाढली* 

मुंबई : कोविड – १९ विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्यामध्ये लहान मुलांना अधिक बाधा होऊ शकते, हा वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील लहान मुलांचे रक्त नमुने विषयक (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार मुंबईतील ५० टक्केपेक्षा जास्त बालकांमध्ये कोविड – १९ प्रतिपिंड (Antibodies) विकसीत झाल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत प्रतिपिंड असलेल्या लहान मुलांची संख्यादेखील जास्त आढळली असून ही बाब समाधानकारक मानली जात आहे. 

संभाव्य तिसऱया लाटेमध्ये लहान मुलांना आणि बालकांना देखील कोविड – १९ विषाणूचा धोका पोहोचू शकतो, ही बाब लक्षात घेता, कोविडच्या दुसऱया लाटेदरम्यानच लहान मुलांचे रक्त नमुने विषयक सर्वेक्षण करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक १ एप्रिल २०२१ ते दिनांक १५ जून २०२१ दरम्यान लहान मुलांचे सेरोलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बाई. य. ल. नायर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीव वैद्यकीय निदान प्रयोगशाळा यांनी संयुक्तपणे रक्त नमुने विषयक (सेरोलॉजिकल) सर्वेक्षण राबविले. वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी चाचणी करण्याकरीता संपूर्ण मुंबईतून आलेल्या रक्त नमुन्यांमधून विभागनिहाय नमुने घेऊन हे सर्वेक्षण राबविण्यात आले.   

मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभाग मिळून एकूण २ हजार १७६ अनोळखी रक्त नमुने वेगवेगळ्या वैद्यकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले. यामध्ये महानगरपालिकेच्या आपली चिकित्सा वैद्यकीय प्रयोगशाळांच्या विविध शाखा आणि नायर रुग्णालय यांच्या माध्यमातून १ हजार २८३ आणि खासगी २ वैद्यकीय प्रयोगशाळातून ८९३ रक्त नमुने संकलित करण्यात आले. या रक्त नमुन्यांची आवश्यक प्राथमिक चाचणी केल्यानंतर प्रतिपिंडांसंदर्भातील चाचणी करण्यासाठी हे सर्व रक्त नमुने कस्तुरबा रुग्णालयातील सूक्ष्मजीवनिदान वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.

संकलित रक्त नमुन्यांच्या चाचणी अंती प्राप्त झालेले प्रमुख निकष पुढीलप्रमाणे आहेतः- 

मुंबईतील ५१.१८ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. पैकी, महानगरपालिकेच्या प्रयोगशाळातील ५४.३६ टक्के तर खासगी प्रयोगशाळातील ४७.०३ टक्के नमुन्यांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. 


वयवर्षे १० ते १४ या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे ५३.४३ टक्के बालकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत.


वयोगटानुसार विचार करता वयवर्ष १ ते ४ गटामध्ये ५१.०४ टक्के, ५ ते ९ वयोगटामध्ये ४७.३३ टक्के, १० ते १४ वयोगटामध्ये ५३.४३ टक्के, १५ ते १८ वयोगटामध्ये ५१.३९ टक्के मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. वय १ वर्ष ते १८ पेक्षा कमी या संपूर्ण वयोगटाचा विचार केल्यास ही सरासरी ५१.१८ टक्के इतकी होते.  


विशेष म्हणजे यापूर्वी म्हणजे मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये वयवर्ष १८ पेक्षा कमी असलेल्या वयोगटात आढळलेल्या प्रतिपिंडांचा विचार केल्यास सुमारे ३९.०४ टक्के इतक्या मुलांमध्ये प्रतिपिंडे आढळली होती. त्या तुलनेत आता प्रतिपिंडे असलेल्या मुलांची संख्या / टक्केवारी वाढली आहे. याचाच दुसरा अर्थ असा आहे की, दुसऱया लाटे दरम्यानच १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुले / बालके कोविड – १९ विषाणूच्या सान्निध्यात (exposed) आली होती. 


संभाव्य तिसऱया लाटेमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील लहान मुले / बालक / नवजात बाळ यांना कोविड – १९ ची बाधा होऊ शकते, असा वैद्यकीय क्षेत्रातून अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, सदर सर्वेक्षणातील आढळलेली तथ्य लक्षात घेतले तर, जवळपास ५० टक्के लहान मुलांना यापूर्वीच कोविडची बाधा झाल्याचे अथवा विषाणूच्या सान्निध्यात ते आल्याचे या अभ्यासातून सूचित होते. 


लहान मुलांमध्ये कोविड – १९ संसर्गाची बाधा कमी करता यावी, यासाठी लहान मुलांना नजरेसमोर ठेऊन आरोग्य शिक्षण देणे, कोविड – १९ सुसंगत वर्तणुकीबाबत जनजागृती करणे, विशेषतः समाज माध्यमांचा वापर करुन कार्टुन जाहिराती, आकर्षक अशा जिंगल्स इत्यादींचा उपयोग करण्याची सूचना देखील या सर्वेक्षणातून करण्यात आली आहे. 


सदर रक्त नमुने विषयक सर्वेक्षण अभ्यास करुन त्यातील निष्कर्ष मांडणी करण्यासाठी नायर रुग्णालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या गृह अधिकारी  डॉ. गार्गी काकाणी यांनी मुख्य अन्वेषक. म्हणून तर, सह मुख्य अन्वेषक म्हणून सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. जयंथी शास्त्री यांनी कामकाज सांभाळले. तसेच नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागातील प्राध्यापक डॉ. सुरभी राठी आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सची अग्रवाल यांनी सह अन्वेषक म्हणून योगदान दिले आहे. 


महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार, नायर रुग्णालयातील रोगनिदानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कुसुम जशनानी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. गायत्री अमोणकर यांचे देखील सहकार्य लाभले आहे. 

===


Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget