महापरिनिर्वाण दिन पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथील तयारी पूर्णत्वाकडे
• *अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त श्री. हर्षद काळे, पोलीस उप आयुक्त श्री. प्रणय अशोक आदींनी केली संयुक्त पाहणी*


मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात येत असलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी आज (दिनांक २ डिसेंबर २०२१) पाहणी केली. 


 यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे सोमवार दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी चैत्यभूमी येथे होणार्‍या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते सकाळी १० कालावधीमध्ये केले जाणार आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूट्यूब: https://bit.ly/6december21YT/ फेसबूक: https://bit.ly/6december21FB / ट्विटर: https://bit.ly/6december21TT या लिंकचा उपयोग करता येईल.


 दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसेच, डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तेथेही व्यवस्था करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे ही सर्व कामे पूर्णत्वास आली असून त्याची पाहणी डॉ. संजीव कुमार यांनी आज केली. पोलीस प्रशासनाच्या तयारीची पाहणीदेखील त्यांनी पोलीस उपआयुक्त श्री. प्रणय अशोक यांच्यासह केली.


 याप्रसंगी महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ २) श्री. हर्षद काळे यांच्यासह जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर, एफ/दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.


 कोविड-१९ विषाणू संसर्ग नियंत्रणात आला असला तरी कोविडच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचा धोका निर्माण झाल्याने दक्षता बाळगणे आवश्यक झाले आहे. ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने संक्रमित होणारा कोविड विषाणू प्रकार असल्याने, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन शासनाकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे. 


 दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी ७.४५ ते सकाळी १०  या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.


 महापरिनिर्वाण दिनी सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे लिंक उपलब्ध आहेत. यूट्यूब: https://bit.ly/6december21YT/ फेसबूक: https://bit.ly/6december21FB / ट्विटर: https://bit.ly/6december21TT

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget