महापौर किशोरी पेडणेकर आणि व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त प्रयत्नांतून ५० ते १०० जणांना मिळणार ‘दृष्टी संजीवनी’*२५ डिसेंबर २०२१ रोजी वयाच्या ६० व्या वर्षात पदार्पण करित असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांचा दृढ संकल्प*

 

*व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महापौरांकडून १ लाख रुपयांची देणगी प्रदान*


मुंबई महानगराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पद भूषवतानाच विविध सामाजिक कार्यात देखील अग्रेसर राहणाऱया महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर या दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी वयाच्या ६० व्या वर्षात पदार्पण करित असून त्या निमित्ताने महापौरांनी अनोखा संकल्प केला आहे. मागील २८ वर्षांपासून सामाजिक भावनेतून देशभरातील नेत्र रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणारी व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया ही संस्था किमान ५० ते १०० गरजू व्यक्तिंवर मोतिबिंदू व तत्सम इतर शस्त्रक्रिया करणार असून त्यासाठी महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांचा पुढाकार लाभला आहे. एवढेच नव्हे तर, महापौरांनी वाढदिवसाचे औचित्य साधून व फाऊंडेशनच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन १ लाख रुपयांची वैयक्तिक देणगीदेखील प्रदान केली आहे. 

महापौर निवासस्थानी आज (दिनांक २४ डिसेंबर २०२१) ही घोषणा करण्यात आली. यावेळी महापौरांसह व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित नेत्र तज्ज्ञ डॉ. कुलीन कोठारी आणि या भागीदारीसाठी समन्वय साधणारे महानगरपालिकेचे सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त) श्री. चंद्रशेखर चोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. 

या उपक्रमाविषयी माहिती देताना महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर याप्रसंगी म्हणाल्या की, उद्या वयाच्या ६० व्या वर्षात मी पदार्पण करित आहे. तसेच माझ्या सुपुत्राला पुत्ररत्न म्हणजेच मला नातूदेखील लाभला आहे. या दुहेरी आनंदातून जनतेसाठी सेवा करता यावी, या भावनेने व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया या विख्यात संस्थेला १ लाख रुपयांची वैयक्तिक देणगी सुपूर्द केली आहे. फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. कुलीन कोठारी यांच्या कार्याविषयी मी परिचित आहे. १९९३ मध्ये स्थापन झालेल्या या फाऊंडेशनने भारतभरात ११ लाख गरजू नेत्र रुग्णांवर आवश्यक त्या नेत्र शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प स्थापनेवेळी सोडला होता. आजपर्यंत जवळपास १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील मिळून सुमारे ५ लाख ६० हजारपेक्षा अधिक नेत्र रुग्णांवर या फाऊंडेशनने विनामूल्य शस्त्रक्रिया केल्या आहेत. ‘राष्ट्रीय नेत्र यज्ञ’ या नावाने चालविला जाणारा हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे महापौरांनी नमूद केले. 

पुढे त्या म्हणाल्या की, ‘व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया’ च्या ‘राष्ट्रीय नेत्र यज्ञ’ उपक्रमाला हातभार लावण्यासाठी माझ्या ६० व्या वाढदिवस निमित्ताने भागीदारी केली आहे. जे गरजू रुग्ण मोतिबिंदू अथवा कमकुवत दृष्टीने ग्रस्त असतील किंवा अन्य नेत्र आजार असतील, अशा रुग्णांना महापौर या नात्याने फाऊंडेशनकडे संदर्भित केले जाईल. त्या रुग्णांची आवश्यक ती पूर्व तपासणी, शस्त्रक्रिया तसेच कॉन्टॅक्ट लेन्स् सारख्या साधनांची पूर्तता या सर्व बाबींचा खर्च व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या सहयोगातून करण्यात येईल. त्यासाठी इतर आवश्यक ती मदत मी देखील करणार आहे, असे महापौरांनी सांगितले. 

*व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया विषयीः-* सन १९९३ मध्ये स्थापन झालेली ‘व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया’ ही बिगर शासकीय आणि ना नफा तत्त्वावर कार्यरत अग्रगण्य संस्था आहे. समाजातील तळागाळातील ज्या गरजू व्यक्तिंना नेत्र उपचार मिळत नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना वैद्यकीय उपचार, शस्त्रक्रिया, औषधे इत्यादी पुरविण्याचे कार्य संस्थेकडून केले जाते. जेणेकरुन, अंधत्वाच्या समस्येचे वेळीच निदान करुन नेत्र रुग्णांना दृष्टी संजीवनी मिळावी, हा यामागील उद्देश आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या कार्याचा विस्तार देशभर झाला असला तरी एकूण कार्याच्या २० टक्के नेत्र वैद्यकीय सेवा ही एकट्या महाराष्ट्रात पुरविली जाते. फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. कुलीन कोठारी यांनी भारतातून दृष्टीहीनत्वाची समस्या दूर करण्याच्या हेतूने झपाटून संस्थेची स्थापना केल्यानंतर समाजातील अनेक नामांकित, प्रतिष्ठित मान्यवर फाऊंडेशनचे सदस्य बनले. देशभरातील कुशल नेत्रतज्ज्ञ या फाऊंडेशनशी जोडले गेले आहेत. राष्ट्रीय नेत्र यज्ञ, मधुमेह ग्रस्तांसाठी शुगर एन साईट, झोपडपट्टी वासियांसाठी मुंबई अर्बन स्लम आय केअर, पोलीस बांधवांसाठी पोलीस ज्योती, बालकांसाठी बालदृष्टी आणि दूरवरच्या प्रदेशांमध्ये राहणाऱया लोकांसाठी मोबाईल आय क्लिनिक, नवनीत शाह आयबँक, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रायमरी रुरल व्हिजन केअर सेंटर असे विविध उपक्रम या फाऊंडेशनकडून विनामूल्य चालविले जातात. संस्थेचे हे सेवाभावी कार्य पाहून निरनिराळ्या व्यक्ती, कॉर्पोरेट व संस्था असे दाते देणगीच्या माध्यमातून या नेत्रसेवा कार्याला आर्थिक हातभार लावतात.       

**

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget